मोह

Published on : 26-Apr-2022 12:11:32

आई आता ही साडी नका नेसू, आडजुनी झाली आहे. पुढे पतवंडाच्या दुपट्यासाठी येईल कामाला. अरूणा सासुबाईंना म्हणाली.
आपल्या आडजुन्या लुगड्याचे भाग्य फळफळणार वाटतं, म्हणत त्यांनी त्या पातळाची घडी घालून घडीवर हळूवार हात फिरवून बाजूला ठेवली.
बरं झालं,लवकरच पतवंडाचे आगमण होणार दिसतय घरात. पण मला बापड्या म्हातारीला कोण कुठे सांगतय. आपण आपला अंदाज बांधायचा.
हल्ली घरात मी कमीच बोलते. कारण काही बोलायला गेले कि, आज्जी तुझा काळ वेगळा होता. आता बदलय म्हणत नातवंड तोंड बंद करतात.म्हणून न बोललेलेच बरं. डोळे असून पाह्यचे नाही. कान असुन ऐकायचे नाही. हे धोरण ठेवले तरच सुख लागते.
मनाशी संवाद साधत असताना सुनबाईंनी मेथीची भाजी पुढे सरकवली. आई तेवढी निवडून द्या डब्याला हावी उद्याच्या. सरळ हुकमच.हुकमच कसला हक्काने सांगते घरात सामावून घेते हे काय कमी झाले का?..
असो हातपाय चालतात तोपर्यंत करायचे. मेथीची भाजी निवडून हातावेगळी केली. अजून काही असेल तर सांग अरुणा, पण सुनबाईं तिथे ऐकायला हव्या तर ना!
आज काल संसारातुन मोह माया मुद्दामच कमी करून घेतली. कोणी सल्ला विचारायला आले कि, आधी त्यांचे म्हणणे ऐकून घेते. सल्ला देते पण पटला तर घ्या म्हणते. त्यामुळे सगळी नाती कशी टिकून राहिले आहेत.
नाहीतर सुनेच्या संसारात वाजवी पेक्षा जास्त लक्ष घातले तर नाती राहतात पण परिणाम उलटे होतात. लपवाछपवी जास्त होते. ओलावा कमी होतो. अनुभवाने केस पांढरे झाले आहेत. दुसरं काय?
शेवटी मोहमायेत आपण गुंतवायचे का मोहापासून विरक्ती घ्यायची शेवटी हा भावनिक गुंता आहे. पण माझ्या मते विरक्ती घेतली तर सुख आपल्याला लागते आणि आनंदही मिळतो.
सुनबाईं अरूणा जवळ येऊन बसली. आई काय ग वाती करत नामस्मरण करते आहे श्री समर्थांचें. नाही हो आई थोडे बोलायचे होते. मग बोल ना परवानगी कशाला मागतेस? आई तुम्ही जशी सगळ्यांतून विरक्ती घेतली. मला जमेल का हो ? का ग इतक्या लवकर कंटाळलीस. नाही आई असेच. काहीतरी खदखदत आहे तुझ्या मनात बोल मोकळी हो अरूणा!..
अरूणाने सासुबाईंना घट्ट मिठी मारली. मनमोकळे केले. सासुबाईंच्या पदराला डोळे पुसत म्हणाली. आई अडून अडून कानावर आले की, संयोगिता आणि विशाल वेगळे बिह्राड करतायेत.
अग मग करू दे कि, राहू दे वेगळे त्यांना जबाबदारीची जाणीव होईल. तसे नाही पण, गरोदर आहे संयोगिता. झेपेल का तिला?कारण काय कळेल का? काही नाही आॉफीस लांब पडते. म्हणे आता अश्या परिस्थितीत दगदग सहन होणार नाही.
एवढेच ना जाऊ दे आणि तिच्या आईच्या जवळ घर घेते आहे ना चांगले आहे. शेवटी अरू लग्न होईपर्यंत मुलगा आपला असतो लग्नानंतर आपला राहत नाही. फक्त अनुभवाने शिकायचे. मोह सोड मायेचा. दुरून डोंगर साजरे. गरज लागली तर धावून जा. तिथे प्रेमाची तुलना करू नको.
शेवटी विरक्ती महत्वाची अरू, माझं बांडगुळ आहेच की तुला मोहपाशात अडकावयाला. विसर सगळे आणि ती पातळ ठेवलीत बघ अडजुनी हवी आहेत ना तुला? फक्त नीट ठेव लक्षात राहतील अश्या जागेवर. उद्या येतीलच कामाला.
असेच असते आडजुनं बाजूला ठेवायचे बघ मोह माया पण बरका! कधीतरी कामाला येईल म्हणून. त्याच्या मोहात नाही पडायचे.


रुह-d-Soul

Share On

Back


Copyright © 2021 MI. All rights reserved | Developed by MaharashtraInfotech