
पहिल्याच भेटीत कोणी इतकं आपलेपणाची भावना देऊन जातं?
अनेक वर्षाचा संबंध असणारे लोक, माझ्या शेजारच्या टेबलावर अनेक वर्षं नोकरी करणारी सहकारी
माझे शाळा कॉलेज मधील मित्र हे सर्व माझ्याशी जेवढ्यास तेवढेच संबंध ठेवून आहेत.....
शेजारच्या घरातले काका-काकू आणि मी केवळ शिष्टाचाराची घडी मोडण्या पुरतेच रस्त्याने जाताना एकमेकांकडे पाहून स्मितहास्य देते (घरात काही विशेष केल्यावर एकमेकांना आवर्जून एक ताट पदार्थ भरून कागदाने झाकून
द्यायची पद्धत आता कधीच नामशेष झालेली आहे)....पण या सगळ्याला अपवाद ठरवत काही लोक अचानक आपल्या आयुष्यात येतात.......
जन्मोजन्मीचा ऋणानुबंध असल्यासारखे आपलेपणाचे गीत हळूच कानात गाऊन जातात.....
त्याची आणि माझी चॅट बॉक्स मधील मुलाखत अगदी अल्प काळाची असते, मुलाखत अगदी तासभर जरी चालली तरी एका क्षणात संपून गेल्यासारखे वाटते.....
माझी आवडती कुल्फी कँडी हातात आल्यावर ती संपू नये असं वाटत असतं, पण तिचा आस्वाद घेतला नाही तर ती विरघळून गळून जाणार असते, तसंच काही त्याच्याबरोबरच्या मुलाखतीचे झालेलं असतं.......
हा संवाद कधीच संपू नये असंही वाटत असतं, पण जबाबदाऱ्यांचा रहाट गाडगयाला चालवताना त्याचा निरोप घ्यावा लागतो... दोघेही एकमेकांना आपापली काळजी घेण्याचे वचन देऊन चॅटबॉक्स मधून बाहेर पडतो.......
अचानक ग्रीष्मात तप्त झालेल्या भूमीवर वळवाच्या थंडगार पावसासारखं त्याच माझ्या आयुष्यात येणं आणि वळवाच्या पावसासारखंच झटपट निघून जाणे मनाला लागतं.....
त्याची आणि माझी ही ताटातूट क्षणिक आहे असं म्हणून मी मनाची समजूत काढते आणि स्वतःलाच सांगते "अगं तू कधी पण मेसेज टाक ना... तो 101℅ रिप्लाय देणार.... भावखाऊ पोराच्या जमातीशी त्याचा लांबलांब संबंध नाही"......
मी सुखावते. माझ्या मनाच्या तप्त भूमीवर त्याच्या विचारांच्या टपोऱ्या थेंबांनी घेतलेल्या तिरकस उड्यांनी माझी विचाररूपी मृत्तिका सुगंधित झालेली आते.........
ती चॅटबॉक्स मुलाखत संपल्यावर एखाद्या रोमँटिक वेब सिरीज चा पहिला सिझन संपल्यावर जी चुटपूट लागते तसंच काहीतरी वाटतं.त्याची भेट कधी होणार याची मी आवर्जून वाट बघते ..... पण त्याच्या उपस्थिती च्या खुणा, त्याच्या आठवणी अजूनही माझ्या हृदयात पिंगा घालत असतात... लोकल मधून उतरून चालताना माझ्या पाठीवरच्या बॅगेचं ओझं मला काहीच वाटेनासे होते....त्याचा सुगंध मनात साठवून मी घराची वाट तुडवू लागते ....
आणि ओठावर येते.....
ए रात जरा थम थम के गुजर
मेरा चांद मुझे आया है नजर.....
रुह-d-Soul