बाॅयकाॅट

Published on : 14-Sep-2022 16:20:24

गेल्या काही वर्षांपासून किंवा त्याच्याही आधीपासून सिनेअभिनेते नेहमीच कोणत्या न कोणत्या बातमीमुळे प्रकाश झोतात असतातच. सिनेमा हा तर त्यांचा मुळ विषय आहेच. पण त्या सिनेमासोबत चालत येणारी एखादी बातमी त्या सिनेमाला आणि अभिनत्याला जास्त फायदा करून जाते. तो किंवा ती अभिनेता/अभिनेत्री त्या एका बातमीमुळे प्रत्येकाच्याच बोलण्यात यायला लागतात. गेल्या काही काळापासून अनेक चित्रपटांना ‘बाॅयकाॅट’ हा शब्द चिटकून येऊ लागला आहे आणि ह्याचीच पुढे वृत्तवाहिन्यांद्वारे ‘बातमी’ बनवल्या जाते. मग तो सिनेमा आणि त्याचा मुख्य नट लगेच अपेक्षेपेक्षा जास्त प्रकाशझोतात येतात. एका बाजूने आपण म्हणजे आम जनता याला त्यांचा ‘लाॅस’ समजत असलो तरी दुसर्‍या बाजूने त्यांच्या सिनेमाचा व नटाचा फायदाच होत असतो. ‘निगेटिव्ह पब्लिसिटी’ ही अनेकवेळा मुद्दाम केली जाते.
अश्यातच यालाच जोडून एक घटना घडू लागते. ज्या सिनेमाचं व नटाचं बाॅयकाॅट ‘ट्रेंड’ करत असतं, त्या सिनेमाचा आणि नटाचा विरोध आपल्यापैकी बरेच लोकं करू लागतात. पण आपल्याला इतर कोणता तरी नट किंवा नटी आवडत असते ते ‘ह्या’ नटाच्या तसेच त्याच्या ‘बाॅयकाॅट’ सिनेमाच्या समर्थनात येतात किंवा ‘आणले’ जातात. मग इथे आपली म्हणजे आम जनतेची तारांबळ उडते. कारण ज्या नटाला किंवा नटीला आपण चांगलं समजत असतो, आपण त्याचे समर्थक असतो तोच आपला ‘अपेक्षाभंग’ येथे करतो. “अरे हा बघ! ह्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर तो काय जोरदार त्या सिनेमाची जाहिरात करतो आहे रे!!! हा पण किंवा हि पण अशी निघेल अशी अपेक्षा नव्हती रे!”, असं सहज आपण बोलून जातो. मग पुढे आपण त्या आपल्याच चहात्या नटाचं किंवा नटीचं मिशन ‘बाॅयकाॅट’ सुरू करतो. फेसबूकवर, ट्विटरवर किंवा इंन्स्टाग्राम च्या कमेंट बॉक्स मध्ये अद्वातद्वा बोलून लागतो. आपली भडास काढतो. एका गोष्टीकडे आवर्जून बघायचं म्हणजे ह्या भडास काढण्यात देखील आम जनतेचा एक वेगळाच प्रकार आहे. नट असेल तर त्याच्या विरोधात आपण त्याला ‘लाचार’ किंवा एखादी खालच्या पातळीची शिविगाळ करतो. पण जर नटी असेल तर आपण सरळ तीच्या ‘चारित्र्या’वर ‘हल्लाच’ चढवतो. तिला ‘बाजारू’ म्हणू लागतो.
कोणताही नट किंवा साधारण व्यक्ति हा ज्या कार्यक्षेत्रात असतो तो त्यातच नेहमी काम करत असतो आणि ‘अर्थार्जन’ करत असतो. मुळात नट हा देखील सामान्य मनुष्य आहे आणि सामान्य मनुष्यच नट होत असतो, हे आपण विसरतो. नटाला चांगले पैसे मिळणार असतील तर त्यावेळेपुरता तो त्याचे तत्व बाजूला ठेऊन काम करतो. त्या नटाने आपली तत्वे बाजूला ठेवली की, आपण मिशन ‘बाॅयकाॅट’ सुरू करतो. एकावेळेस ह्याला बरोबर समजता येईल. कारण एखाद्या नटाचे तो दाखवत असलेले तत्व नेहमी तेच आहे असं नाही. पण त्याच्या समर्थनार्थ येणारे आपले आवडते नट बहुतेक त्यांचे खरे तत्व सोडून काम करतात तेव्हा आपण जो विरोध करतो तो विरोध आपले मन दुखावल्या गेल्यामुळे करतो. इथे एक गोष्ट आपण विसरतो की, तो आपल्या आवडीचा नट, बहुतेक, केवळ अर्थार्जन करायला असे करत असेल?
आपलीच गोष्ट किंवा आपलीच बाजू आपण बघायला गेलो तर अनेकवेळा आपल्याला ‘प्रमोशन’ मिळावं म्हणून आपल्याच साथीदाराला सोडून नावडत्या व आपल्या तत्वात न बसणाऱ्या ‘बाॅस’च्या होकारात होकार मिळवतो ना! किंवा एखादा प्रोजेक्ट आपल्याला मिळावा, टेंडर हाती लागावा म्हणून एखाद्या अधिकारीला भेटताना त्याला ‘चहा पाणी’ विचारतो ना? हा अधिकारी आपल्या विचारांच्या विरोधातला जरी असला तरी ‘त्या’ वेळेपुरता तोच सर्वस्वी होतो ना? अश्या स्थितीत आपल्या आसपासचे आपलेच लोकं आपला विरोध करू लागतील किंवा ‘बाॅयकाॅट’ करू लागतील याचा विचार आपल्याला शिवत देखील नाही, हो ना? मग अश्या वेळेस ह्याच सामान्य माणसाचा नट नाही का झाला?
एखादा सिनेमा वाईट असू शकतो किंवा वाईट उद्देशाने बनवलेला असू शकतो. त्यातला मुख्य नट देखील आपली काही तत्व तथा धोरणं मुद्दाम राबवायचा प्रयत्न देखील सिनेमाद्वारे करू शकतो. ते सारं आपल्या आधीच लक्षात आलं तर त्या सिनेमाला आणि नटाला ‘बाॅयकाॅट’ करणं हा न्याय ठरू शकतो. पण फक्त अर्थार्जन करण्यासाठी समर्थन करणाऱ्या आपल्या आवडत्या नटाचा/नटीचा विरोध करणं, चारित्र्यावर प्रश्न उचलणं, हे न्याय ठरू शकत नाही. जो ज्या कार्यक्षेत्रात असतो त्यात तो प्रत्येक काम केवळ अर्थार्जन करणासाठी करत असतो. मग तो एखादा अभिनेता असो वा आपण!

रुह-d-Soul

Share On

Back


Copyright © 2021 MI. All rights reserved | Developed by MaharashtraInfotech