सेल्फी

Published on : 17-Sep-2022 11:11:03

सेल्फी
माझ्या मनात एक विचार येतो हल्ली. म्हणजे काय की मी बरेचदा सेल्फी काढते. काही काम नसलं, कंटाळा आला असला, हल्लीच्या भाषेत लो वाटत असलं की मी सेल्फी काढते. प्रथम सहज म्हणून काढायला लागले नंतर टाईमपास म्हणून. माझ्या लक्षात एक गंमत आली की माझे सेल्फी छान येतात. अगदी डोळे मिटून काढला तरीही. पण माझे दुसर्‍याने काढलेले फोटो छान येत नाहीत तितके. मग मी विचार करायला लागले की तीच मी दोन्हीकडे भिन्न कशी? मी काही रूपसुंदरी नाही. एक सर्वसामान्य व्यक्ती. पण मग फोटोत एक ठोकळेबाज मी सेल्फीत जिवंत कशी काय होते? मग मला उमगलं ते असं की जेव्हा मी फोटो काढून घेते तेव्हा फोटोग्राफरचं, आजूबाजूच्या वातावरणाचं एक धूसर दडपण माझ्यावर असतं. माझा फोटो छान आला पाहिजे म्हणून मी बळंच हसते, जे तद्दन कृत्रिम असतं. याउलट सेल्फी काढताना मी मलाच निरखते. अँगल, प्रकाशयोजना मी वारंवार बदलते आणि मुख्य म्हणजे हे करताना मी सहज असते. दडपणरहित. यातला फार छान भाग आहे दडपणरहित. स्वतःला निरखणं. त्यावेळी मनी आलेले भाव सेल्फीत उमटतात. मग ती आनंद देते उभारी देते. मलातरी छान वाटतं. स्वतःशी केलेला संवाद असतो तो. तुम्हीही करून बघा. तुम्हालाही असा अनुभव येईल. मात्र त्याआधी लक्षात घ्या की आपल्याला सुंदर दिसायचं नाही, मनमोकळं दिसायचय.माझ्या फोटो काढण्याच्या सवयीला सगळेच वैतागतात...पण मला आवडत सेल्फी काढायला..शेवटी स्वतःला काय आवडत हे पण महत्वाचं आहेच ना.
बघा तुम्हाला पण जमतंय का असा स्वतःशीच स्वतः संवाद साधायला ...आणि विशेष म्हणजे स्वतःच स्वतःवर प्रेम करायला....प्रयत्न तर करा.

रुह-d-Soul

Share On

Back


Copyright © 2021 MI. All rights reserved | Developed by MaharashtraInfotech